Maharashtra Desi Jugad : अलीकडे शेती करणे जिकिरीचे बनले आहे. शेती व्यवसाय हा डेरिंग असलेल्या लोकांचा आहे. एकतर आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमधून उत्पन्न मिळेलच हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात बहुकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळेलच याचीही गॅरंटी नाही.
मात्र तरीही बळीराजा काळ्या आईशी इमान राखत अविरतपणे शेती करतच आहे. शेतकरी राजा त्याच्या पुढ्यात येणाऱ्या विविध संकटांचा हसतमुखाने सामना करत असून संकटांवर मात करत आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत आहे. खरंतर अलीकडे शेतमजुरांची मोठी कमतरता भासू लागली आहे. आधीच निसर्गाचा आणि बाजाराचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
आता त्यात मजुरांची टंचाई देखील शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. मजूर टंचाईमुळे शेतीमधील कामे वेळेत होत नाहीत. पेरणीची, हार्वेस्टिंगची, निंदणी, खुरपणी, कोळपणी यांसारखी कोणतीच कामे वेळेत होत नाहीत. पण शेतकरी बांधव याही परिस्थितीतून मार्ग काढून घेतात. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मजूर टंचाईवर आपल्या देशी जुगाडाने मात केली आहे.
खरंतर, खरिपातील पिकातून चांगले जोरदार उत्पादन मिळवायचे असेल तर पिक तण विरहित ठेवणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी खुरपणी, निंदणी करणे गरजेचे आहे. तसेच पिकाची कोळपणी देखील अतिशय आवश्यक आहे. मात्र कोळपणी करण्यासाठी अनेकदा मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर गावातील बालाजी जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या साडेतीनशे रुपये असा भन्नाट जुगाड तयार केला आहे की त्यांचे कोळपणीचे काम अगदी सहजतेने पूर्ण झाले आहे. जाधव यांनी चक्क मोटारसायकलीच्या माध्यमातून कोळपणी केली आहे. जाधव यांनी कोळपे मोटरसायकलला जोडण्यासाठी एक सॉकेट तयार करून घेतले आहे.
या सॉकेटमध्ये कोळपे जोडून त्यांनी कोळपणी पूर्ण केली आहे. म्हणजेच बैल जोडीऐवजी त्यांनी मोटरसायकलला कोळपे जोडून कोळपणी पूर्ण केली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याचा हा जुगाड पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. जाधव यांचा हा जुगाड पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या वावरात तोबा गर्दी केली आहे. विशेष असे की, या देशी जुगाडासाठी जाधव यांना अवघा साडे तीनशे रुपये खर्च आला आहे.
जाधव सांगतात की, कोळपनीचे हेच काम, औताच्या सहायाने केले असते तर चार जण लागले असते. पण, मोटरसायकलने कोळपणी केली असल्याने अवघ्या दोन माणसात कोळपणी पूर्ण झाली आहे. यामुळे साहजिकच मजुरीच्या पैशात बचत झाली आहे. विशेष म्हणजे एका वेळी चार एकर रान कोळपले जात आहे. निश्चितच या शेतकऱ्याने केलेला हा जुगाड इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.