Maharashtra Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. खानदेशातील नंदुरबार धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कापूस लागवड पाहायला मिळते. यातील जळगाव जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यातील कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील घुली पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र येथे परवानाधारक कापूस खरेदीदार यांच्या माध्यमातून कापूस खरेदी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
खरे तर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून कापसाची वेचणी सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी केल्यानंतर आपला कापूस घरात साठवून ठेवला आहे. तसेच काही शेतकरी बांधव पैशांची निकड असल्याने आपल्या जवळील कापूस खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर आहेत.
मात्र खेडा खरेदी करणारे कापूस व्यापारी खूपच कमी दरात कापसाची खरेदी करत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. यामुळे नंदुरबार मध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.
यानुसार आता बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घुली पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आज पासून या केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली असून आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी दहा वाहनांमधून कापूस विक्रीसाठी आणला गेला. यातून जवळपास 100 क्विंटल कापसाची आवक झाली.
या ठिकाणी पहिल्याच दिवशी कापसाला कमाल सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. या ठिकाणी गेल्या वर्षी 55000 क्विंटल कापसाची आवक झाली होती. येथे गेल्यावर्षी सुरुवातीला कापसाला नऊ हजाराचा भाव मिळाला होता.
मात्र नंतर आवक वाढत गेल्यानंतर कापसाचे भाव कमी झाले होते. गेल्या वर्षीच्या संपूर्ण हंगामात कापसाला या ठिकाणी 7000 ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. दरम्यान, यंदा शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळणार अशी आशा आहे.