Maharashtra Budget 2024 : काल 27 जून 2024 पासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान आज वर्तमान सरकारने अर्थसंकल्प 2024-25 सादर केला आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे.
अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. अनेक ताकतवर नेते या निवडणुकीत पराभूत झाले असल्याने महायुतीने आता सावध पवित्रा घेतला आहे. सर्वसामान्यांची नाराजी महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगली जड भरली आहे.
त्यामुळे येत्या तीन महिन्यांनी लागणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्यांची नाराजी अंगलट येऊ नये यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आता विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर पुरवणारी योजना जाहीर केली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची आज मोठी घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत.खरे तर गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
प्रामुख्याने इंधन दरवाढ आणि गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेटवर परिणाम करत आहेत. मात्र आता महायुती सरकारने राज्यातील महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
गॅस सिलेंडर वापरणे प्रत्येकाला परवडावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून याची घोषणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ही घोषणा केली आहे. पण, या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत काही फायदा होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.