Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला आहे. विशेषतः जेव्हापासून रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी दाखल झाली आहे तेव्हापासून रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झाला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. हेच कारण आहे की, या गाडीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2019 मध्ये सर्वप्रथम या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले.
नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर धावत आहे. विशेष बाब म्हणजे मार्च 2024 पर्यंत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील 75 महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
यासाठी रेल्वेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील आगामी काळात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातून सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुसाट धावत आहे.
अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान ही नवीन गाडी चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
मुंबईतील मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. वास्तविक सद्यस्थितीला मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात आहे. ही गाडी अहमदाबाद मार्गेच रवाना होते आणि या गाडीला अहमदाबाद येथे थांबा देखील देण्यात आला आहे.
पण या गाडीमध्ये प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक राहते. प्रत्येक ट्रीपला ही गाडी हाउसफुल राहते आणि प्रवासी वेटिंगवर राहतात. हेच कारण आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
आता मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे या गाडीचे ट्रायल रन देखील सुरू झाले आहेत. तथापि, या मार्गावर ही गाडी केव्हा चालवायची याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या माध्यमातूनच घेतला जाणार आहे. याशिवाय पुणे ते वडोदरा दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाईल असे वृत्त समोर आले आहे.