Land Purchase Limit In Marathi : भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीसाठी देशात जमीन खरेदीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. शेतीसाठी आपल्या देशात शेतीयोग्य जमिनीची मागणी सातत्याने वाढत आहे. खरे तर देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने जमिनीची मागणी देखील वाढली आहे. यामुळे साहजिकचं जमिनीचा तुटवडा भासत असून यामुळे जमिनीच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत.
शेती योग्य जमीन फक्त शेतीसाठीच नाही तर गुंतवणुकीसाठी देखील एक चांगला पर्याय ठरत आहे.जमिनीत केलेली गुंतवणूक अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. तथापि शेत जमीन खरेदी विक्री बाबत आपल्या देशातील काही राज्यांमध्ये काही कठोर नियम देखील पाहायला मिळतात. देशातील अनेक राज्यांमध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंतच जमिनीची खरेदी करता येते. म्हणजेच शेत जमीन खरेदी करण्याबाबत सरकारने निर्बंध लावलेले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण एक व्यक्ती देशातील कोणत्या राज्यात किती जमीन खरेदी करू शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केरळमध्ये काय आहे नियम : केरळमध्ये जमीन दुरुस्ती कायदा 1963 अंतर्गत, एक अविवाहित व्यक्ती केवळ 7.5 एकर जमीन खरेदी करू शकतो. त्याच वेळी, 5 सदस्यांचे कुटुंब 15 एकर पर्यंत जमीन खरेदी करू शकते.
महाराष्ट्रात काय आहे नियम : महाराष्ट्रात शेती करणारे लोक म्हणजे शेतकरीचं जमीन खरेदी करू शकतात. भारतातील सर्वच शेतकरी महाराष्ट्रात जमीन खरेदी करू शकतात. महाराष्ट्रात एक व्यक्ती अधिकाधिक 54 एकरपर्यंतची शेत जमीन खरेदी करता येऊ शकते.
कर्नाटक मध्ये काय आहेत नियम : कर्नाटक मध्ये देखील आपल्या राज्याचेचं नियम लागू आहेत. या ठिकाणी फक्त शेतकरीच शेत जमिनीची खरेदी करू शकतात. तसेच कर्नाटक मध्ये एक व्यक्ती अधिकाधिक 54 एकरपर्यंतची शेत जमिन खरेदी करता येऊ शकते.
पश्चिम बंगाल मध्ये काय आहे नियम : पश्चिम बंगालमध्ये तेथील राज्य सरकारने एका व्यक्तीला अधिकाधिक 24.5 एकर एवढी जमीन खरेदी करण्याला परवानगी दिली आहे. यापेक्षा अधिक जमीन पश्चिम बंगालमध्ये खरेदी करता येऊ शकत नाही.
गुजरात मध्ये कसा आहे नियम : गुजरात मध्ये फक्त खेडूत अर्थातच शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतो. जे लोक शेतकरी नाहीत त्यांना गुजरात मध्ये शेत जमीन खरेदी करता येऊ शकत नाही.
हिमाचल प्रदेश मध्ये काय आहे नियम : हिमाचल प्रदेश राज्यात तेथील राज्य शासनाने ३२ एकर पर्यंतची शेत जमीन खरेदी करण्याला परवानगी दिलेली आहे. यापेक्षा अधिक जमीन हिमाचल प्रदेश मध्ये खरेदी करता येत नाही. हिमाचल प्रदेश मध्ये बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येत नाही.
उत्तर प्रदेश मध्ये कसा आहे नियम : यां राज्यात एक व्यक्ती जास्तीत जास्त 12.5 एकर लागवडीयोग्य जमीन खरेदी करू शकते. यापेक्षा अधिक शेती योग्य जमीन उत्तर प्रदेश मध्ये खरेदी करण्याला प्रतिबंध आहे.
बिहार मध्ये काय सांगतो नियम : बिहारमध्ये तेथील राज्य शासनाने जमीन खरेदी बाबत एक नियम तयार केलेला आहे. त्यानुसार या राज्यात केवळ 15 एकरपर्यंत शेती किंवा बिगरशेती जमीन खरेदी करता येऊ शकते. यापेक्षा जास्तीची जमीन तेथे खरेदी केली जाऊ शकत नाही.