Lakhpati Didi Yojana : देशात गेल्या काही वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्रातील मोदी सरकारने लखपती दिदी योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती. ही योजना संपूर्ण देशभर राबवली जात आहे.
दरम्यान, या योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
सीतारामन यांनी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लखपती दीदी योजनेबाबत सुद्धा त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले की, देशातील अनेक महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळत आहे.
तसेच त्यांनी आता त्याचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटी झाले असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नेमकी ही योजना काय आहे आणि या योजनेच्या लाभासाठी कोणकोणत्या पात्रता लागतात, कागदपत्रे काय लागतात आणि यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे याविषयी आज आपण समजून घेणार आहोत.
काय आहे लखपती दीदी योजना
या योजनेअंतर्गत देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे, त्याची दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय या योजनेअंतर्गत कर्ज देखील उपलब्ध होते.
ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जात आहे. देशातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आले आहे. यामुळे ही देशातील महिलांसाठी एक आनंदाची वार्ता राहणार आहे.
योजनेच्या आवश्यक पात्रता
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचा लाभ देशातील सर्वच इच्छुक महिलांना मिळू शकतो. या योजनेसाठी वयोमर्यादा सुद्धा नाही. सर्व उत्पन्न गटातील भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी सुरू झालेली आहे. महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटांसोबत जुडून या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्जदाराला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा असे काही कागदपत्रे सादर करावी लागतात.
योजनेचा लाभ कसा घेणार?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना बचत गटासोबत जुडावे लागणार आहे. तसेच महिला बचत गटांना बिजनेस प्लॅन तयार करावा लागेल. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवेल. यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल. जर अर्ज स्वीकारला गेला तर महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाते.