Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. एमपी अर्थातच मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जात आहेत.
मात्र राज्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये मिळत आहेत. या योजनेचा राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार हे विशेष. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळणार आहे.
परंतु ज्या महिलेचा जन्म पर राज्यात झाला आहे आणि जिने महाराष्ट्रात अधिवास असणारा पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलेला याचा लाभ दिला जाऊ शकतो. या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू झाले असून रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले गेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे 29 ऑगस्ट पासून या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज सादर केले होते त्यांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पैसे मिळालेत आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले होते त्यांना 29 ऑगस्ट पासून पैसे मिळायला सुरुवात झाली.
या योजनेसाठी सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुदत दिली होती. मात्र सरकारच्या या मुदतीत अनेकांना अर्ज सादर करता आला नाही. हेच कारण आहे की राज्यातील शिंदे सरकारने या योजनेचे अर्ज करण्यासाठी सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणीसाठी सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज करता येणार आहे.
यामुळे ज्या महिलांनी या योजनेसाठी अजून अर्ज सादर केलेला नसेल त्यांना अर्ज भरता येणार आहे तसेच ज्यांचा अर्ज अपात्र ठरवला गेला असेल त्यांना पुन्हा अर्ज करता येणार आहे. यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. पण, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे.
मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजारावर पाणी सोडावे लागणार आहे.
आता महिला वर्ग या योजनेसाठी ज्या महिन्यात नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना देण्याचा महत्त्वाचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.