Ladki Bahin Yojana : सध्या संपूर्ण देशात दीपोत्सवाचा सण साजरा होत आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात मोठे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान दिवाळीच्या काळातच सर्वसामान्य महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाली असून या अंतर्गत जुलै महिन्यापासून लाभ दिला जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यातील नोव्हेंबर महिन्याचा पैसा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
पण या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार असाही प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान याच संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली आहे. या योजनेचा पुढील सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यांच्या पैशांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत की, लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अर्थातच आचारसंहितेमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले. पुढे बोलताना त्यांनी डिसेंबर महिन्याच्या पैशासंदर्भात अपडेट दिली.
ते म्हणाले, आता मी आपल्याला सांगतो की, 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर, याच नोव्हेंबरमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार आहोत. कारण आमचा हेतू स्पष्ट आहेत. आम्ही देणारे लोक आहोत घेणार नाही. एकंदरीत निवडणूक झाल्यानंतर लगेचच या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या सरते शेवटी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जर या चालू महिन्यातच डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले तर लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.