Kolhapur Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक बनला आहे. विविध नैसर्गिक संकटांमुळे शेती करणे परवडत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. मात्र अशा या विपरीत परिस्थितीमध्ये देखील राज्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नव-नवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगले काम करून दाखवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून देखील असेच एक कौतुकास्पद उदाहरण समोर आले आहे. तालुक्यातील बुवाचे वाठार येथील प्रयोगशील शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानावर पेरू लागवड करून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
सचिन यांनी त्यांच्या दोन एकर जमिनीवर पेरूची लागवड केली असून त्यांना या दोन एकर पेरू बागेतून सहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे या बागेतून त्यांना आणखी उत्पादन मिळणार असून कमाईचा हा आकडा आणखी वाढू शकतो.
सचिन सांगतात की माळरान जमिनीवर उसाची लागवड केल्यास अधिकचे पाणी द्यावे लागते. तसेच उसाच्या खोडवा उत्पादनात देखील मोठी घट पाहायला मिळते.
यामुळे त्यांनी फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन मिळेल अशा फळाचे त्यांनी निवड करण्याचे ठरवले. यानुसार त्यांनी पेरूची बाग लावली आहे.
त्यांनी व्हीएनआर या जातीच्या पेरूची 900 रोपे लावली आहेत. या रोपांची लागवड बारा बाय आठ फूट या अंतरावर करण्यात आली आहे. पेरूच्या पिकासाठी त्यांनी शेणखताचा आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.
रासायनिक खताचा संतुलित वापर केल्यामुळे पेरूच्या बागेतून त्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे. विशेष बाब अशी की त्यांनी उत्पादित केलेला पेरू हा थेट दुबईला विक्रीसाठी पाठवला जात आहे.
यामुळे सध्या सचिन यांची पंचक्रोशीत चर्चा रंगली असून हातकणंगलेचे आमदार राजू आवळे यांनी देखील त्यांच्या पेरू बागेला भेट दिली आहे.यावेळी आमदार आवळे यांनी सचिन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन यांना गेल्या चार महिन्यांपासून पेरूच्या बागेतून उत्पादन मिळत असून आणखी एक महिना या बागेतून त्यांना उत्पादन मिळणार आहे. आतापर्यंत त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पादन झाले आहे. यासाठी त्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा खर्च केला आहे.
अर्थातच खर्च वजा जाता सव्वातीन लाख रुपयांची कमाई झाली असून कमाईचा हा आकडा आणखी वाढणार आहे. कारण की आणखी एक महिना पेरूच्या बागेतून उत्पादन मिळत राहणार असल्याची माहिती सचिन यांनी दिली आहे.