Kisan Sanman Nidhi Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
दरम्यान केंद्राच्या या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे.
या योजनेतूनही राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. अर्थातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय योजना अंतर्गत सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये दिले जात आहेत.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून या पैशांमुळे सर्वसामान्य गरजवंत शेतकऱ्यांची पैशांची निकड दूर होते. गोरगरीब शेतकऱ्यांच्या संसाराला या पैशामुळे मोठा हातभार लागतोय. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार असे म्हटले जात होते.
मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर येत नव्हती. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने किसान सन्मान योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात किसान सन्मान योजनेचे पैसे वाढवले जाणार असे म्हटले आहे.
किसान सन्मान योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार रूपये मिळत आहेत, मात्र त्यात वाढ करून आता शेतकऱ्यांना १५ हजार देण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
किसान सन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये दिले जातील म्हणजेच या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 12 हजार रुपयांच्या निधीमध्ये आणखी तीन हजार रुपयांची भर घातली जाणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री इराणी यांनी केलीये.
यामुळे शेतकऱ्यासह सर्वच नागरिकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केले. त्या जनक व्हिला कार्यालयातील मैदानावर मंगळवारी आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.
काल, शिरपूर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे काशिराम पावरा यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. पावरा यांच्याचं प्रचारार्थ काल ही सभा झाली.
या सभेला माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, तालुकाध्यक्ष किशोर माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.