Success story: 2020 मध्ये संपूर्ण जगावर कोरोना नामक (Corona) एक मोठे संकट उभं राहिलं होतं. या महाभयंकर आजारांमुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन ची वेळ आली होती. आपल्या देशातही लॉकडाऊन लावलं गेले होते.
यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना शहराकडून गावाकडे पलायन करावे लागले. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
मात्र जो होता है वो अच्छे के लिये होता है या म्हणीप्रमाणे उत्तराखंडमध्ये एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील (Uttrakhand) पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले सतींदर रावत हे दुबईतील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होते. आता व्यवस्थापक म्हटल्यावर पगार देखील चांगलाच असणार त्यांनाही चांगला पगार होता.
लॉकडाऊनमुळे एप्रिल 2020 मध्ये त्यांची नोकरी गेली. यानंतर त्यांनी आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तो गावात परतला आणि काहीतरी नवीन आणि जरा हटके करण्याचा विचार करू लागला.
दरम्यान, त्याला मशरूम शेतीची माहिती मिळाली. मशरूमच्या लागवडीतून (Mushroom Farming) अल्पावधीत चांगले उत्पन्न मिळू शकते, असा सल्ला काही जणांनी त्याला दिला.
यानंतर सतींदरने रामनगर येथील शेतकऱ्याकडून मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्याच्याकडून मशरूम वाढवण्याची आणि खत तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेतली.
सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी 1.5 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि मशरूमची लागवड सुरू केली. यासाठी त्यांनी पक्के घर बांधण्याऐवजी झोपडी मॉडेलवर काम सुरू केले, जेणेकरून खर्च कमी येईल.
सुरवातीला 6 लाखांची कमाई
सतींदरने दोन झोपड्या उभारल्या. जानेवारी 2021 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मशरूम लागवड केली. दोन महिन्यांनी, म्हणजे मार्चपासून मशरूम बाहेर येऊ लागले. यानंतर त्यांनी स्थानिक मंडई तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मशरूमचा पुरवठा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी सुमारे 6 लाख रुपये कमावले. सध्या ते बटण मशरूम आणि ऑयस्टर मशरूम अशा दोन प्रकारच्या मशरूमची लागवड करत आहेत. यामध्ये त्याची पत्नी सपना देखील त्याला खूप सपोर्ट करते. तसेच त्यांनी 10 जणांना कामावर घेतले आहे. दर महिन्याला चांगल्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन होत असल्याचे सतींदर सांगतो.
मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर
मार्केटिंगसाठी ते सध्या सोशल मीडिया आणि स्थानिक रिटेलर्सची मदत घेत आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे नाव श्रीहरी अॅग्रोटेक असे ठेवले आहे.
याद्वारे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या बाहेरील राज्यात देखील ते त्यांचे मशरूम पाठवत आहेत. स्थानिक पातळीवर ते मंडई आणि उपाहारगृहांना पुरवठा करत आहेत. यातून दरमहा अडीच लाखांची कमाई होत असल्याचे सतेंदर सांगतात.