Kapus Bajarbhav : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कापसाची लागवड पाहायला मिळते. शिवाय गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला होता.
जाणकार लोकांच्या मते गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कधी नव्हे ती कापसाला मोठी मागणी आली होती. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव मिळाल्याचे जाणकारांनी नमूद केले.
गेल्या वर्षी चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी देखील कापसाला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र यावर्षी शेतकरी बांधवांची ही आशा फोल ठरली आहे. सुरुवातीचा काही काळ वगळता यावर्षी कापसाला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.
तसेच, तेलबिया पेंड महाग झाल असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली आहे. परिणामी कापसाची मागणी वाढली असून कापसाला चांगला बाजार भाव मिळत आहे. दरम्यान तब्बल 35 वर्षानंतर सुरू झालेल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. 9 तारखेला झालेल्या लिलावात बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे.
तसेच दहा तारखेला झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजार भाव मिळाला आहे. सध्या मिळत असलेला बाजार भाव हा निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. मात्र असे असले तरी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मिळत असलेला बाजार भाव हा राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत किंचित अधिक आहे. खरं पाहता बारामती एपीएमसीमध्ये आता कापसाचे चांगले आवक होत आहे.
आठ तारखेला एपीएमसीमध्ये तब्बल 100 क्विंटल कापसाची आवक झाली. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात या एपीएमसीमध्ये कापसाची आवक वाढणार असून बारामती एपीएमसी पुन्हा एकदा कॉटन हब म्हणून ओळखले जाईल असा विश्वास बाजार समिती प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
बुधवारी आणि शनिवारी या बाजार समितीमध्ये आवक होते. या ठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावाच्या दिवशी शेतकरी बांधवांना पैसे हस्तांतरित केले जातात. यामुळे शेतकरी बांधवांचा ओघ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला आहे.