Kapil Dev Farming : भारताला 1983 मध्ये सर्वप्रथम क्रिकेट विश्वचषकाला गवसणी घालता आली. त्यावेळी या विजयी संघाची धुरा कपिल देव यांच्या हातात होती. कपिल देव यांनी भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला.
यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी भारताला दुसरा विश्वचषक जिंकून दिला. दरम्यान या दोन्ही विजयी संघाच्या कर्णधारांमध्ये आता एक गोष्टीचे साम्य आढळत आहे. ते म्हणजे दोघांना शेती करणे आवडते.
मिस्टर कुल एमएस धोनी यांचे शेती करतानाचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियामध्ये नेहमीच वायरल होत असतात. ते आपल्या जन्मगावी शेतीमध्ये राबतात. शेतीमधील एमएस धोनी यांच्या व्हिडिओजला चाहते पसंती देखील देतात.
दरम्यान आता एम एस धोनी यांच्यानंतर कपिल देव हे देखील शेतीमध्ये रमणार असल्याचे चित्र आहे. कारण की मूळच्या पंजाब राज्यातील कपिल देव यांनी आपल्या महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी केली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी तब्बल 16 एकर जमीन खरेदी केली आहे. यामुळे त्यांनी ही जमीन नेमकी कुठे खरेदी केली आहे आणि या जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांना किती रुपये मोजावे लागले आहेत याविषयी आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कपिल देव यांनी कुठे खरेदी केली जमीन
अलीकडे अनेक सेलिब्रेटी लोक ऑरगॅनिक फार्मिंग करण्यास पसंती दाखवत आहेत. कपिल देव यांनी देखील ऑरगॅनिक फार्मिंगसाठीच 16 एकर जमीन खरेदी केली असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल देव यांनी मुंबई जवळील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे ही जमीन खरेदी केली आहे.
नेरळ येथील मोग्रज गावाच्या पायथ्याशी ही जमीन आहे. या जमिनीपाशी सोलनपाडा हा जगप्रसिद्ध धबधबा आहे. दरम्यान, या 16 एकर जमिनीसाठी कपिल देव यांना आठ कोटी रुपये मोजावे लागले आहेत.
विशेष म्हणजे हा व्यवहार नोंदणी करण्यासाठी त्यांना जवळपास 1.03 कोटी रुपये एवढी स्टॅम्प फी भरावी लागली आहे. नेरळ येथील प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांच्या निरीक्षणात हा व्यवहार झाला असून याची नोंदणी ही पूर्ण करण्यात आली आहे.
कपिल देव यांनी तुळशीराम गायकर यांच्या नावे असलेली ही 16 एकर जमीन आता खरेदी केलेली आहे. म्हणजेच आता कपिल देव या सोळा एकर जमिनीचे मालक झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील कोथिंबे गावात कपिल देव यांनी 25 एकर जमीन खरेदी केली असल्याचे बोलले जात आहे.
म्हणजेच कपिल देव 41 एकर जमिनीचे मालक बनले आहेत. यामुळे आता क्रिकेटपटू कपिल देव बागायतदार कपिल देव म्हणून ओळखले जातील. मात्र या जमिनीत कपिल देव कोणती शेती करणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.