Kanda Niryat : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू असून या निवडणुकीत कांदा निर्यातीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. या मुद्द्यावरून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून तथा शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शासनावर जबरदस्त दबाव बनवला जात आहे. या मुद्द्याचा सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसणार असे बोलले जात आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदा निर्यातीस काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून अर्थातच तीन मे 2024 ला परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील नाशिक, अहमदनगर समवेतच प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक आणि अहमदनगर मधील निवडणुका सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय निवडणुकीमुळे घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या रोषापुढे सरकारने सपशेल माघार घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काल या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदी लागू झाली.
ही बंदी 31 मार्च 2024 पर्यंत होती. मात्र निर्यात बंदी उठवण्याची वेळ जवळ येताच सरकारने निर्यात बंदीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. जोपर्यंत पुढील आदेश निघत नाही तोपर्यंत निर्यात बंदी कायम राहणार असे सरकारने म्हटले.
पण, विपक्षी नेत्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना निवडणुकीत चांगला फटका बसणार असे मत राजकीय विश्लेषकांनी नमूद केले. मध्यंतरी सरकारने आपल्या काही मित्र राष्ट्रांना मर्यादित स्वरूपात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती.
पण सरकारने सरसकट कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली पाहिजे अशी मागणी केली जात होती. कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजी होती. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची ही नाराजी शासनाला चांगलीच जड जाणार असे म्हटले जात होते.
दरम्यान शेतकऱ्यांची हीच नाराजी कमी करण्यासाठी काल अर्थातच तीन मे 2024 रोजी एक नोटिफिकेशन जारी करत कांदा निर्यातीला काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. आता आपण कांदा निर्यातीसाठी कोणकोणत्या अटी आणि शर्ती लावून देण्यात आल्या आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहेत अटी आणि शर्ती
सरकारने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये कांदा निर्यातीसाठी कमीत कमी निर्यात मूल्य ५५० अमेरिकन डॉलर प्रति टन असायला हवे. म्हणजे निर्यातदारांना ४६ ते ४७ रुपये प्रति किलोच्या खाली कांदा विकता येणार नाही हे या नोटिफिकेशन वरून स्पष्ट होत आहे.
तसेच कांद्यावर ४० टक्के एक्स्पोर्ट ड्युटी देखील कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने यावेळी घेतला आहे. यामुळे कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली असली तरी देखील या अटींमुळे शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.