Kanda Market : कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर शेती केली जाते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र एवढेच नाही तर कोकणात देखील कांद्याची लागवड होते. कोकणातील काही भागात पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. मात्र, कांदा बाजारात नेहमीच लहरीपणा राहतो.
बाजारातील लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते. यावर्षी देखील बाजारात लहरीपणा पाहायाला मिळाला. सुरुवातीच्या टप्प्यात अर्थातच जानेवारी महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला. यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याचे दर दबावात गेलेत. फेब्रुवारी ते जून दरम्यान कांद्याचे बाजारभाव कमालीचे दबावत राहिले.
जुलै महिन्यात मात्र परिस्थिती बदलली. कांद्याला चांगला भाव मिळू लागला. ऑगस्ट महिन्यात तर कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. पण केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाजारात मोठी मंदी पाहायला मिळाली. काही काळ चांगल्या मालाला देखील अपेक्षित असा भाव मिळाला नाही. यानंतर आता गेल्या दहा-बारा दिवसांपासून पुन्हा एकदा बाजारभावात सुधारणा होत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील कांदा लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव एपीएमसी मध्ये 2100 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळाला होता. आधीच्या तुलनेत गेल्या आठवड्यात कांद्याच्या किमती सरासरी पाच टक्क्यांनी वाढल्यात, अर्थातच भाव वाढत आहेत. परंतु कांद्याची आवक सातत्याने कमी होत आहे.
याचाच अर्थ आवक कमी होत असल्यानेच भाव वाढत आहेत. अशातच आता ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत कांद्याचे बाजार भाव कसे राहणार, कांदा बाजार मंदीत जाणार की तेजीत राहणार? असे प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारले जात आहेत. दरम्यान आता आपण याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर राज्याच्या कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष पुणे येथे कार्यरत असून येथील तज्ञ पिकाच्या संभाव्य बाजारभावाबाबत माहिती देत असतात. निवडक पिकांचे बाजारभाव अहवाल देखील देतात. दरम्यान येथील तज्ञांनी कांदा बाजार भाव पुढील दोन महिने कसे राहणार, किती भाव मिळू शकतो याबाबत भाकीत वर्तवले आहे. येथील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टो ते डिसेंबरं २०२० मध्ये कांद्याला सरासरी ३१५३ रु. प्रती क्विंटल भाव मिळाला होता. तसेच ऑक्टो ते डिसें. २०२१ मध्ये रु. २३२१ प्रती क्विटल एवढा सरासरी भाव मिळाला होता.
याशिवाय ऑक्टो ते डिसे. २०२२ मध्ये रु. १८५४ प्रती क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला होता. यावरून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये रु. २००० ते ३००० प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळू शकतो, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. मात्र हे फक्त भाकीत असून एवढाच भाव मिळेल अस नाही. हा तज्ञ लोकांनी वर्तवलेला अंदाज आहे यानुसारच बाजार भाव राहतील असे निश्चित नाही.