Kanda Lilav : केंद्र शासनाने गेल्या महिन्यात कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. निर्णयानंतर नासिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले होते. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेनंतर मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांसमवेत चर्चा करून या मुद्द्यावर तोडगा काढला आणि पुन्हा एकदा कांदा लिलाव पूर्ववत सुरू केले होते.
दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद केले आहेत. त्यामुळे मात्र जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. एकतर आधीच शासनाच्या अनैतिक धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे आणि आता व्यापाऱ्यांनी देखील आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी पुकारलेला हा बेमुदत कांदा लिलाव बंद शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे.
यां अशा विपरीत परिस्थितीमध्ये मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजारात आता लवकरच कांद्याचे लिलाव सुरू केले जाणार आहेत. लोकमत अग्रोला विंचूर उपबाजार समितीच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 28 सप्टेंबर 2023 पासून पुन्हा एकदा विंचूरच्या उपबाजारात कांद्याची लिलाव सुरू होणार आहे.
परंतु उद्या अनंत चतुर्दशी आहे यामुळे विंचूर उप बाजारामध्ये सकाळच्या सत्रातच कांद्याचे लिलाव होतील दुपारच्या सत्रात उद्या मार्केट बंद असेल. पण 29 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत. मात्र, हा निर्णय फक्त विंचूर उप बाजारसंदर्भात झाला आहे.
जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव समवेतच विविध बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंदच राहणार आहेत. दरम्यान शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.