Kanda Bajarbhav : सध्या लोकसभा निवडणुकीची लगीनघाई पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय सनई चौघडे वाजू लागले आहेत. मात्र या निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा खूपच चर्चेत राहिला आहे. खरे तर केंद्र शासनाने डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदी लागू केली. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती.
दरम्यान, मध्यंतरी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी 31 मार्चनंतर देखील सुरू राहणार आणि जोपर्यंत पुढील आदेश निघत नाही तोपर्यंत ही निर्यात बंदी कायम राहणार अशा आशयाचे शासन परिपत्रक काढून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला.
केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा बाजार भावात दबाव पाहायला मिळाला. डिसेंबर 2023 पासून कांद्याचे बाजार भाव दबावातच होते. पण, आता निवडणुकीच्या काळात कांद्याचा मुद्दा अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे.
पुन्हा एकदा कांदा निर्यात सुरू झाली आहे. दरम्यान सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर बाजारात मोठी सकारात्मकता पाहायला मिळत असून कांदा बाजार भावात गेल्या कित्येक महिन्यांनी पुन्हा एकदा तेजी दिसत आहे.
काल झालेल्या लिलावात राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे भाव 2500 पार गेले आहेत. तर काही ठिकाणी बाजार भाव आणि 3000 रुपयाचा टप्पा देखील पार केला आहे. काल रविवार असल्याने राज्यातील काही मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ण झाले आहेत.
या लिलावात मात्र कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण होते. दरम्यान, आता आपण राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव?
जुन्नर-ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3010 आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 2600 आणि सरासरी 1900असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2600 आणि सरासरी 1800 असा भाव मिळाला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल 2500 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये लोकल कांद्याला किमान 700, कमाल 2300 आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.