Kanda Bajarbhav Ahmednagar : कांदा उत्पादनासाठी नाशिक अन अहमदनगर विशेष ओळखले जातात. खरं पाहता, या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते. अशातच यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सुरुवातीपासूनच कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यातील पहिला पंधरवाडा या कालावधी दरम्यान कांदा जवळपास 2500 रुपये प्रति क्विंटल ते 3000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भावात विक्री झाला आहे. मात्र नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा दरात मोठी घसरण सुरु झाली. तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होणारा कांदा मात्र एक हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास विकला जाऊ लागला.
यामुळे साहजिकच कांदा उत्पादकांची गोची झाली. दरम्यान आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून कांदा दरात वाढ होत आहे. मात्र काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात जवळपास दोनशे रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे. घोडेगाव एपीएमसी कांदा लिलावासाठी विशेष ओळखले जाते. अशातच काल घोडेगाव एपीएमसी मध्ये कांद्याची आवक वाढली.
त्यामुळे कांदा दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. काल झालेल्या लिलावात घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 38,209 गोणी कांदा आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याचे आवक सर्वाधिक होती. उन्हाळी कांद्याची जवळपास 30,565 गोणी आवक झाली तर 7644 गोणी लाल कांदा आवक झाली.
उन्हाळी कांदा 200 ते 2050 रुपये प्रति क्विंटल आणि लाल कांदा 800 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री झाला. म्हणजेच गेल्या लिलावाच्या तुलनेत दोनशे रुपयांची घट झाली. सध्या लाल कांदा आवक कमी आहे मात्र आता हळूहळू नवीन लाल कांदा आवक वाढणार आहे त्यामुळे भविष्यात अजून दर घसरतील की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.