Kalyan Thane Metro Line : राजधानी मुंबईमध्ये आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.
सध्या शहरात विविध मार्गावरील मेट्रो मार्गांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. तर काही मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आली आहेत. कल्याण ते ठाणे दरम्यान देखील मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. कल्याण-ठाणे मेट्रो 5 हा एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग असून यामुळे कल्याण आणि ठाणे परस्परांना मेट्रो मार्गाने कनेक्ट होणार आहेत.
परिणामी या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. हा मेट्रो मार्ग 29.4 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर एकूण पंधरा स्थानके राहणार आहेत. या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यात सहा स्थानके आणि उर्वरित स्थानके दुसऱ्या टप्प्यात राहतील.
या मार्गिकेचा पहिला टप्पा भिवंडी येथील धामणकर चौक ते ठाणे येथील कापूरबावडी असा राहणार आहे. कापूरबावडी येथे ही मार्गीका ठाणे ते वडाळा या मेट्रो मार्ग चारला जोडली जाणार आहे. Metro 5 च्या पहिल्या टप्प्यात बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका ही स्थानके राहणार आहेत.
या मार्गाचे गाड्याच्या दुरुस्तीचे कारशेड कशेळी येथे प्रस्तावित आहे. मात्र या प्रस्तावित करण्यात आलेल्या कारशेड साठी आवश्यक असलेली जमिन वने व खारफुटीच्या परिसरात येत आहे. यामुळे याच्या कामासाठी मोठा अडथळा निर्माण होणार अशी शक्यता आहे. परिणामी हा अडथळा दूर करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतची निविदादेखील एम एम आर डी ए कडून काढण्यात आली आहे. दरम्यान ही निविदा जो कंत्राटदार जिंकेलं त्याला वनविभागासंबंधित नऊ प्रकारच्या परवानग्या आणि उच्च न्यायालयातून खारफुटी तोडण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. याशिवाय इतरही बाबींचा अभ्यास सदर कंत्राटदाराला करावा लागणार आहे.
तसेच याबाबतचा विस्तृत अहवाल एमएमआरडीए नऊ महिन्यात सादर करायचा आहे. यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामाला नऊ महिन्याचा विलंब होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सल्लागाराने अहवाल सादर केल्यानंतर कारशेड उभारणीसाठी निविदा निघणार आहे.
खरंतर कोणत्याही मेट्रो मार्गासाठी कार शेड आवश्यक असते. कारशेड नसले तर मेट्रो सुरु होऊ शकत नाही. यामुळे कारशेडसाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सल्लागाराला नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असल्याने हे काम आता नऊ महिने उशिराने होणार असे सांगितले जात आहे.