Kalyan News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबई प्रमाणेचं मुंबईलगत वसलेल्या महानगरांचा देखील झपाट्याने विकास झाला असून मुंबई महानगरक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
नवी मुंबई आणि कल्याण मध्ये होणारी वाहतूक कोंडी कोणापासून लपून राहिलेली नाही. या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.
कल्याणचे खासदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
दरम्यान, याच विकास कामांमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयोगी ठरणारां प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत करणारा शीळफाटा उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षात सुरू होणार आहे.
या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका 15 जानेवारी 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. या उड्डाणपुलामुळे कल्याण फाटा ते शिळफाटा रस्त्यावर होणारी जवळपास सर्वच वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.
एवढेच नाही तर ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
दरम्यान या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. ऐरोली आणि काटई येथील बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली दरम्यान प्रवासासाठी फक्त 5 ते 10 मिनिट लागणार आहेत.
सध्या या प्रवासासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागत आहे. यामुळे हा देखील प्रकल्प या भागातील नागरिकांसाठी दिलासा देणारा राहणार आहे.