Kadaknath Chicken : आपल्याकडे शेतीचा व्यवसाय हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील बहुतांशी लोक शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. यामुळे भारताला कृषिप्रधान देशाचा दर्जा प्राप्त आहे. आपल्या देशात शेती सोबतच अनेक शेतीपूरक व्यवसाय देखील केले जात आहेत. शेतीपूरक व्यवसायात पशुपालन आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
कुक्कुटपालन करणारे अनेक शेतकरी बांधव कोंबडीच्या विविध जातींचे पालन करतात. गावरान कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय काही शेतकरी बांधव कडकनाथ कोंबडीचे पालन करतात. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
कोंबडीच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात यातीलच एक दुर्मिळ प्रजाती म्हणून कडकनाथ कोंबडीला ओळखले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये बाजारात या जातीच्या कोंबडीला मोठी मागणी आली असून यामुळे कडकनाथ कोंबडी पालन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
या कोंबडीचे पालन मध्यप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात केले जात आहे. मध्यप्रदेश मधील झाबुआ आणि अलीराजपुर या भागात कडकनाथ कोंबडीचे मोठ्या प्रमाणात पालन केले जात असून तेथील स्थानिक या जातीच्या कोंबडीला काळीमासी म्हणून ओळखतात.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कडकनाथ कोंबडीच्या मांसात विविध पोषक घटक आढळतात. यामुळे, या जातीच्या मांसाला बाजारात मागणी असते. याचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने बाजारात याला चांगला भाव मिळतो.
परंतु मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असणारी या जातीची कोंबडी एवढी काळी का असते? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का ? नाही मग आज आपण या जातीची कोंबडी एवढी काळी का असते यासंदर्भात तज्ञ लोकांनी दिलेल्या माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
ही जात पूर्णपणे काळी असते. या जातीचा रंग काळा असतो. मांस, त्वचा आणि रक्त देखील काळे असते. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या कोंबडीत मेलानिन हा रंगद्रव्य आढळतो. यामुळे या जातीची कोंबडी ही पूर्ण काळी असते.
शिवाय या जातीच्या कोंबडी मध्ये लोहाचे प्रमाण अधिक आढळते. मेलानिन आणि लोह या घटकांमुळे या जातीच्या कोंबडीचा रंग काळा होत असतो. विशेष म्हणजे फक्त कडकनाथच नाही तर जगभरात कोंबडीच्या तीन प्रजाती अशा आहेत ज्या की पूर्णपणे काळ्या आहेत.
कडकनाथ शिवाय इतर दोन जाती या चीन आणि इंडोनेशिया मध्ये आढळतात. आपल्या भारतात कडकनाथ कोंबडीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे.
शेती सोबतच कडकनाथ कोंबडीचे पालन करून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. या जातीची कोंबडी ही इतर जातींच्या कोंबडी पेक्षा महाग विकली जाते. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळत आहे.