Jowar Farming : ज्वारी हे देशात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य आणि चारा पीक आहे. ज्वारीच्या धंद्याला बाजारात मोठी मागणी असते शिवाय याच्या चाऱ्याचा उपयोग हा पशुपालनात मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे पशुपालक शेतकरी ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
ज्वारी हे धान्य उत्पादनासोबतच हुरड्याच्या उत्पादनासाठी देखील मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. दरम्यान जर तुम्हीही हुरडा उत्पादनासाठी ज्वारी लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजच लेख कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण ज्वारीच्या हुरडा उत्पादनासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या टॉप तीन जातींची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फुले उत्तरा : हा वाण हुरडा उत्पादनासाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने ज्वारीचा हा वाण विकसित केला आहे. महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त असणारा हा वाण 90 ते 100 दिवसात हूरडयासाठी तयार होतो.
या जातीपासून हेक्टरी 20 ते 25 क्विंटल पर्यंतचे हुरड्याचे उत्पादन मिळते. तसेच या जातीपासून 60 क्विंटल पर्यंतचे चारा उत्पादन मिळते. यामुळे हुरड्याच्या उत्पादनासाठी आणि चाऱ्याच्या उत्पादनासाठी या जातीची लागवड केली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे.
फुले मधुर : राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ज्वारीचा आणखी एक सुधारित आणि हुरड्यासाठी शिफारशीत वाण. फुले मधुर या जातीची महाराष्ट्रात लागवड होते. या जातीचा हुरडा 95 ते 100 दिवसात तयार होतो अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली.
या जातीपासून हेक्टरी ऍव्हरेज 30 क्विंटल हुरड्याचे उत्पादन घेता येणे शक्य असल्याचा दावा केला जातोय. कडबा उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर 60 क्विंटल एवढं उत्पादन मिळतं.
परभणी वसंत : परभणी कृषी विद्यापीठाने अर्थातच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने हुरड्याच्या उत्पादनासाठी परभणी वसंत या जातीची शिफारस केली आहे. विद्यापीठाने तयार केलेला हा एक सुधारित वाण असून या जातीपासून हुरड्याचे विक्रमी उत्पादन घेता येणे शक्य आहे.
ही जात फक्त आणि फक्त 95 दिवसात हुरडा उत्पादनासाठी तयार होते. महत्त्वाचे म्हणजे वर सांगितलेल्या दोन्ही जातींपेक्षा या जातीची उत्पादनक्षमता अधिक आहे.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 34 क्विंटल पर्यंतचे हुरड्याचे उत्पादन सहज मिळवता येऊ शकते. ही जात वेगवेगळ्या रोगांसाठी आणि कीटकांसाठी प्रतिकारक असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.