Fig cultivation:- शेतीमध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत राहणे व नवनवीन पिकांची लागवड करणे या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरते. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक सकारात्मक असे बदल केले असून
परंपरागत पिकांच्या ऐवजी आता विविध प्रकारच्या फळबागांकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत व त्यासोबतच भाजीपाला पिकांची लागवड देखील आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केली जात असल्यामुळे शेतकरी आता कष्टाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करताना
आपल्याला दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी क्षेत्रामध्ये दर्जेदार असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवणे शक्य झाल्याने देखील लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी सहजासहजी देखील शेतकरी मिळवत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण दौंड तालुक्यातील खोर या गावचे प्रयोगशील शेतकरी जालिंदर कुंडलिक डोंबे यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा ध्यास धरला व अंजीर लागवड केली. याच अंजिराने त्यांना आज आर्थिक समृद्धीच्या दिशेने अग्रेसर केले आहे.
जालिंदर डोंबे यांनी अंजीर लागवडीतून साधली आर्थिक प्रगती
दौंड तालुक्यातील खोर गावचे प्रगतिशील शेतकरी जालिंदर कुंडलिक डोंबे हे मुळातच एक प्रयोगशील वृत्ती असणारे व कष्टावर विश्वास ठेवणारे शेतकरी आहेत.
शेती विषयीचा त्यांचा दृष्टिकोन खूपच व्यापक आहे व या व्यापक दृष्टिकोनातूनच ते शेतीमध्ये विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग करत असतात. याच प्रयोगांचा भाग म्हणून त्यांनी घरच्या सदस्यांच्या मदतीने दर्जेदार अंजिराचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या परिसरात अंजिराचे मास्टर आणि मार्गदर्शक म्हणून देखील ओळखले जाते.
जर खोर या गावच्या परिसरातील जमीन बघितली तर ती प्रामुख्याने जिरायती प्रकाराची आहे. तशीच जमीन जालिंदर डोंबे यांची देखील आहे. परंतु त्यांनी या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले व माळरान जमिनीवर अंजिराची बाग फुलवली आहे. साहजिकच या बागेच्या यशस्वी उत्पादनामागे व्यवस्थापन आणि योग्य प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे.
त्यांनी एका एकरमध्ये 180 अंजिराच्या झाडांची लागवड केली व ही लागवड करताना पंधरा बाय पंधरा फुट अंतर ठेवले. लागवडीसाठी त्यांनी अंजिराच्या पुना फिग या जातीची निवड केलेली आहे.
तसेच या अंजीर पिकाचे व्यवस्थापन करताना त्यांनी खत व्यवस्थापनावर योग्य तो भर दिला व यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय खतांचा वापरावर भर देऊन भरघोस असे अंजीर उत्पादन घेण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत.
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे चमकदार तसेच गोड व टिकाऊ असे अंजिराचे उत्पादन त्यांना मिळाले. या पिकाच्या फवारणी करिता ते आधुनिक यंत्रांचा वापर करतात.
अंजीर पिकाचा जर विचार केला तर यामध्ये खट्टा आणि मीठा असे दोन बहार येतात. यामध्ये खट्टा बहारा करिता मे ते जून व मीठा बहाराकरिता सप्टेंबर ते आक्टोंबर या कालावधीत छाटणी करावी लागते व या दोन्ही बहारामध्ये छाटणी केल्यानंतर साधारणपणे चार महिन्यांनी उत्पादन मिळायला सुरुवात होते.
म्हणजेच अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्याने वर्षातील बरेच महिन्यांपर्यंत अंजिराचे उत्पादन त्यांना मिळत राहते व एकरी 15 टन इतके ते अंजिराचे उत्पादन घेतात. आज जर बघितले तर अंजीराला प्रतिकिलो 50 ते 100 रुपये दर मिळत असून ते अंजिराचे पुण्याला विक्री करतात. एकरी साधारणपणे दोन लाख रुपये खर्च होतो व त्यातून वर्षाला ते पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.