खरीप हंगामामध्ये कापसाची लागवड महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्या खालोखाल सोयाबीन या पिकाची लागवड असते. कुठलेही पीक असले तरी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी बंधू अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात व चोख व्यवस्थापन देखील ठेवतात. यामध्ये पिक लागवडीपासून तर कापणी पर्यंत अनेक गोष्टींनी व्यवस्थापनाच्या अनेक पद्धती वापरल्या जातात.
अगदी याच पद्धतीने कापूस पिकापासून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाच्या पद्धती अवलंबतात व यामध्ये प्रामुख्याने खत तसेच पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन इत्यादीला प्रामुख्याने खूप महत्त्व दिले जाते. परंतु या व्यवस्थापनांच्या बाबींशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जर केल्या तर त्यापासून देखील कपाशीचे उत्पादन वाढणे शक्य आहे. याबाबत कापूस संशोधक शेतकरी दादा लाड यांनी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे शुक्रवारी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आयोजित चर्चासत्रामध्ये अनमोल असे मार्गदर्शन केले.
काय म्हणाले दादा लाड?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये प्रसिद्ध कापूस संशोधक शेतकरी दादा लाड यांनी अनमोल मार्गदर्शन केले व या चर्चासत्रामध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, कापसाच्या पिकाला गळफांदी आणि फळ फांदी अशा दोन प्रकारच्या फांद्या असतात व त्यापैकी गळ lफांद्या या फक्त अन्नरस शोषण्याचे काम करतात व त्या उलट फळ फांद्यांवर पाती लागून त्या पात्यांचे रूपांतर बोंडांमध्ये होते. त्यामुळे गळफांदी जर कापली तर फळ फांद्यांवर ज्या काही पात्या लागलेल्या असतात त्यांचे रूपांतर बोंडांमध्ये होते व पर्यायाने उत्पादनामध्ये वाढ होते.
तसेच पुढे त्यांनी म्हटले की, संकरित बीटी कपाशीची लागवड तीन बाय एक फुट अंतरावर करावी आणि 45 दिवसांनी झाडावरील गळफांद्या काढाव्यात. त्यानंतर 90 दिवसांनी कपाशीचा शेंडा साधारणपणे तीन फुटावर खुडावा आणि कपाशीची झाडाची वाढ मर्यादित ठेवावी. तसेच कपाशीच्या भरपूर उत्पादनासाठी कपाशीची लागवड सघन पद्धतीने करावी व एकरी झाडांची संख्या किमान 14800 इतकी ठेवावी. त्यांच्या मते असे केल्याने एका झाडाला सरासरी वीस बोंडे जरी लागली तरी शेतकऱ्यांना एकरी 20 क्विंटल कापूस होऊ शकतो. हे जे कापूस संशोधक शेतकरी दादा लाड यांचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाला दादा लाड कापूस तंत्रज्ञान असे म्हणून देखील ओळखले जाते.