Irrigation Subsidy : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान पुरवलं जातं. शासनाकडून तुषार आणि ठिबक सिंचनासाठी देखील अनुदान मिळतं. केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रति थेंब अधिक उत्पादन या संकल्पनेच्या आधारे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी अनुदानाचे प्रावधान आहे.
ठिबक आणि तुषार संच बसवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून तब्बल 80 टक्के अनुदान दिलं जातं. शेतकरी बांधवांनी पाण्याचा संरक्षित वापर करावा, पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने शासनाकडून ही योजना राबवली जात आहे. ही योजना महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात राबवले जाते. मात्र या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडत आहे.
दरम्यान या योजनेबाबत आता नांदेड जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीवर अर्ज करावा लागतो. यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर योग्य ते कागदपत्रे महाडीबीटी च्या वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर प्रत्यक्ष अनुदान थेट बँक खात्यावर वर्ग केल जात. हे अनुदान केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिलं जातं.
मात्र नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला होता. पण आता 2021-22 या वर्षातील 1331 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. या शेतकऱ्यांचीं महाडीबीटी च्या माध्यमातून लॉटरी पद्धतीने निवड झाली यानंतर त्यांनी ठिबक आणि तुषार संच खरेदी करून अनुदानासाठी मागणी केली होती. मात्र अनुदान मिळण्यास या शेतकऱ्यांना मोठी वाट पहावी लागली. पण आता तीन कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
मात्र असे असले तरी 2022-23 या चालू आर्थिक वर्षातील 1926 शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार संचाचे अनुदान प्रलंबित आहे. यामुळे हे देखील अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान आता 2021-22 या आर्थिक वर्षातील अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असल्याने चालू आर्थिक वर्षातील अनुदान देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडूनही व्यक्त होऊ लागली आहे.