Indian Railway News : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक मुख्य आणि प्रमुख साधन आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. हा प्रवास स्वस्तात आणि जलद होत असल्याने या प्रवासाला नेहमीच पसंती मिळते. बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर असतो, म्हणून या प्रवासाला नेहमीच पसंती दिली जाते.
सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशातील रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. देशातील जवळपास सर्वच शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट झाली आहेत. म्हणून लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा एखाद्या जवळील शहराला जायचे असो सर्वप्रथम डोळ्यासमोर पहिला पर्याय उभा राहतो तो रेल्वेचा.
पण रेल्वे प्रवास करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. खरंतर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. सर्व लोकांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जो कोणी नियमांचे उल्लंघन करतो त्या लोकांकडून नियमानुसार दंड वसूल केला जातो तसेच काही प्रसंगी संबंधित व्यक्तींना तुरुंगवास देखील भोगावू लागू शकतो. वास्तविक, आगामी दोन दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. यामुळे आत्तापासूनच रेल्वे प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान दिवाळीच्या काळात जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि सोबत फायरवर्क्स अर्थातच फटाके घेऊन जात असाल तर थांबा! कारण की रेल्वे प्रवासात फटाके घेऊन जाणे हा गुन्हा आहे.यामुळे जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि सोबत जर फटाके बाळगले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान यंदाच्या दिवाळीत फटाके घेऊन जाऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. दरम्यान आज आपण रेल्वेने प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाण्यावर बंदी आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी बाळगण्यावर आहे बंदी
रेल्वेत ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू नेणे हा एक गंभीर गुन्हा समजला जातो. भारतीय रेल्वेच्या नियमांमध्ये ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू रेल्वे प्रवासादरम्यान बाळगणे एक गंभीर गुन्हा म्हणून ओळखला जातो. हा एक दंडनीय गुन्हा आहे. यामुळे जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि ज्वलनशील पदार्थ तुमच्याकडे आढळले तर तुमच्यावर दंडनीय कारवाई होऊ शकते.
पेट्रोल, डिझेल, रॉकेल, फटाके, गॅस सिलेंडर, बंदुकीची पावडर, असे कोणतेही ज्वलनशील पदार्थ घेऊन रेल्वेने प्रवास केल्यास तुमच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. अशातच आता रेल्वे प्रशासनाने देखील हे ज्वलनशील पदार्थ रेल्वे प्रवासात सोबत बाळगू नका असा इशारा दिला आहे.
ज्वलनशील पदार्थ आढळल्यास काय कारवाई होते
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे डब्यात स्टोव्ह, गॅस किंवा ओव्हन, सिगारेट पेटवल्यास आणि रेल्वेत ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू बाळगल्यास रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १६४ आणि १६५ अन्वये संबंधित प्रवाशांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
प्रवाशांनी या नियमांचे पालन केले नाही तर संबंधित प्रवाशाला एक हजार रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यामुळे रेल्वेने प्रवास करताना या गोष्टींची प्रवाशांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.