India New Expressway : सध्या संपूर्ण देशभरात मोठमोठी महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते विकासात गेल्या काही दशकांमध्ये भारताने मोठी नेत्रदीपक प्रगती केली आहे. खरंतर भारतीय अर्थव्यवस्था आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली आहे. जाणकार लोकांनी आगामी काही वर्षांमध्ये इंडियन इकॉनोमी जगातील तिसरी सर्वात मोठी इकॉनॉमी बनेल असा मोठा आशावादही व्यक्त केला आहे.
जगातील अनेक नामांकित संस्थांनी देखील भारतीय अर्थव्यवस्था चांगली प्रगती करणार असल्याचा दावा केला आहे. एकंदरीत भारत आता तेजीने विकसनशील देशाकडून विकसित होण्याच्या मार्गावर आहे. आपला देश जगाची आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे. यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा भाग म्हणून देशात विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहे. शहरा शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली असून काही महामार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्यात सध्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून या मार्गाचे सध्या स्थितीला नागपूर ते भरवीर हे काम पूर्ण झाले आहे. तसेच भरवीर ते मुंबई पर्यंतचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
याव्यतिरिक्त सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग देखील तयार केला जाणार असून हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जाणार आहे. उत्तर प्रदेश राज्यात देखील विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज ते मेरठ दरम्यान गंगा एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश मध्ये आणखी एका नवीन महामार्गाची पायाभरणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गाजियाबाद ते कानपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे.हा एक्सप्रेस वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जाणार असून याची एकूण लांबी 380 किलोमीटर एवढी असेल. या महामार्गामुळे कानपूर ते गाजियाबाद हा प्रवास गतिमान होणार आहे.
सध्या स्थितीला या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या डीपीआर अर्थातच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचे काम सुरू आहे. अशातच या महामार्गाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने या मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी लवकरात लवकर या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यास सांगितले आहे.
डीपीआर तयार झाला की मग या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी मंजुरी मिळवली जाणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या महामार्गासंदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली होती या बैठकीत या महामार्गाचा डीपीआर येत्या तीन महिन्यात तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जर विहित मुदतीत या महामार्गाच्या DPR चे काम पूर्ण झाले तर आगामी तीन वर्षात या मार्गाचे सिविल काम पूर्ण होईल आणि तदनंतर हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या मार्गाच्या बांधकामामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांना लखनौ-कानपूरला जाण्यासाठी पर्यायी मार्गही उपलब्ध होईल. आतापर्यंत लोक यमुना एक्स्प्रेस वेने लखनऊला जात होते, मात्र नवीन एक्स्प्रेस वे बनल्यावर ते कानपूरमार्गेही लखनऊला जाऊ शकतील.
हा महामार्ग सुरुवातीच्या टप्प्यात चार पदरी राहणार आहे मात्र वाहनांचा दबाव वाढला तर या महामार्गाचा विस्तार केला जाईल आणि मार्गात दोन लेन वाढवल्या जातील. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर गाजियाबाद ते कानपूर हा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांचा प्रवास गतिमान होणार आहे.