India Longest Highway : कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावत असते. यामुळे 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने देशात विविध महामार्गाची पायाभरणी केली आहे.
यातील काही महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांचे कामे अजूनही सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या महामार्गाची कामे येत्या काही महिन्यांमध्ये पूर्णत्वास येण्याची आशा आहे.
त्यामुळे भारताची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होणार आहे. भारतात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार झाले आहेत. काही मार्गांचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये दिल्ली-मुंबई-वडोदरा या महामार्गाचा देखील समावेश होतो.
हा भारतातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे प्रोजेक्ट आहे. सध्या या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत 1350 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर यावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत.
यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास गतिमान होणार आहे. भारतातील हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग विकसित करण्यासाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या मेंटेनेसची जबाबदारी ही एनएचएआय या संस्थेला सोपवण्यात आली आहे.
सध्या मुंबई ते दिल्ली हा प्रवास करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागत आहे. पण जेव्हा हा मार्ग पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल तेव्हा हा प्रवास फक्त आणि फक्त बारा तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
6 राज्यांमधून जाणार
देशातील हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग सहा राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
त्यामुळे या सहा राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून प्रवासाला चालना मिळणार आहे. कृषी, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा क्षेत्राला या मार्गामुळे नवीन उभारी मिळणार आहे. या संपूर्ण मार्गावर 30 टोलनाके तयार होणार आहेत.
यातील प्रत्येक टोल नाक्यावर फक्त दहा सेकंदात गाडी क्रॉस होऊ शकणार आहे. म्हणजेच टोल नाक्यावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही. परिणामी या मार्गावरील प्रवास हा निश्चितच सुलभ आणि जलद होणार आहे.
दरम्यान या भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे काम 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी आशा जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.