देशात सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे खताचा तुटवडा जाणू लागला आहे. तर शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची गरज भागवण्यासाठी देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्या आपले उत्पादन वाढवणार आहे. ,
रासायनिक खतांच्या तुटवड्याचा परिणाम हा जरी शेती उत्पादनावर होणारा असला तरी, त्याचा अतिरिक्त वापरावरही विचार व्हायला हवा. यासाठी कृषी विभागाकडून रासायनिक खतांचा अतिवापर कमी करून रासायनिक खतांना सेंद्रिय खताची जोड दिल्यास उत्पादनही वाढून जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत होणार आहे.
शेतकरी हा खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन जास्त मिळवण्यासाठी खरिपातील कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांसाठी रासायनिक खताचा अधिकचा वापर करतात.असे आता कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.तरी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा वापर वाढवावा यासाठी कृषी विभाग मार्गदर्शन करत आहे.
कमी काळात आधीचे उत्पादन पदरी पाडून घेण्यासाठीही शेतकरी शेतात रासायनिक खताचा वापर वाढवत आहे. अतिरिक्त रासायनिक खत हे मानवी आरोग्यासाठीही घातक आहेच.पण जमिनीचे आरोग्य ही धोक्यात येतेच आणि त्याचा उत्पादकतेवर कायमस्वरुपी परिणाम होतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी मधला मार्ग निवडण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत बदल करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करून जमिनीतील सेंद्रीय खताचा वापर वाढवला पाहिजे.शेतकऱ्याला शेतीपध्दतीत बदल हा एवढा सोपा नाही.
पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना सेंद्रीय शेती पध्दतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमीनीत सेंद्रीय कर्ब वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून गांडूळ खत, नाडेप टाके बांधकाम यासाठी अनुदान दिले जात आहे.
शिवाय रासायनिक खताला सेंद्रीय खताची जोड दिल्यास खर्चही कमी होऊन उत्पादन वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.