परदेशातील ड्रॅगन फळ महाराष्ट्रातील मातीत रुजले असून, गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली आहे. परदेशी मातीत रुजलेल्या ड्रॅगन फळाची लागवड नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकरी करत आहेत. ड्रॅगन फळांना मागणी चांगली असून दरही मिळत आहे.
ड्रॅगन फळांचा हंगाम जून महिन्यात सुरू होतो. तो नोव्हेंबरपर्यंत सुरू असतो. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत ड्रॅगन फळांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ड्रॅगन फळ आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. ड्रॅगन फळाचे सेवन केल्यास रक्तातील पेशी वाढतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळांना मागणी वाढत असल्याचे पुण्यातील मार्केट यार्डातील ड्रॅगन फळांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी सांगितले.
ड्रॅगन फळाचा आकार आणि रंग आकर्षक असतो. पुणे मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज १५ ते २० टन आवक होत असून, लाल रंगाच्या एक किलो ड्रॅगन फळाचे दर प्रतवारीनुसार ४० ते १२० रुपये आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फळाचे दर ३० ते ९० रुपये आहेत.
पांढऱ्या रंगाच्या फळाच्या तुलनेत लाल रंगाच्या फळाला चांगली मागणी असून, येत्या काही दिवसांत ड्रॅगन फळांची आवक आणखी वाढणार आहे. एका फळाचे वजन साधारणपणे १०० ते ६०० ग्रॅम असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.
गेल्या तीन ते चार वर्षांत नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फळांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. ड्रॅगन फळांना पाणी कमी लागते. खडकाळ जमिनीवर लागवड होते. पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत फळधारणा होते. नगर, सोलापूर परिसरातील ड्रॅगन फळांची चव चांगली आहे.
परदेशातील ड्रॅगन फळ महाराष्ट्राच्या मातीत रुजले असून, चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल वाढला आहे, असे मार्केट यार्डातील फळ व्यापारी सुपेकर आणि आंबेकर यांनी सांगितले.
पाच ते सहा दिवस टिकते फळ
शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. महाराष्ट्रात ड्रॅगन फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यूस विक्रेते तसेच आइस्क्रीम उत्पादकांकडून ड्रॅगनला मागणी वाढत आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.
ड्रॅगन फळाच्या लागवडीला पाणी फारसे लागत नाही. ड्रॅगन फळ पाच ते सहा दिवस टिकते. गुजरातमधील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फळाची लागवड करण्यास सुरुवात केल्याचे सुपेकर आणि आंबेकर यांनी स्पष्ट केले.