Hybrid Varieties of Bitter Gourd : अलीकडे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे बदल सुरू केले आहेत. आता फक्त पारंपारिक पिकांची लागवड केली जाते असे नाही तर पारंपारिक पिकांसोबतच तरकारी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे तरकारी पिकाच्या शेतीमधून अर्थातच भाजीपाला पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
कारले हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक असून याची देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण, अनेकदा शेतकऱ्यांना कारल्याच्या कोणत्या सुधारित वाणांची लागवड करावी हे सुचत नाही.
अशा परिस्थितीत, आज आपण कारल्याच्या टॉप 5 संकरित जाती आणि त्यांच्या विशेषता अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी बहुमूल्य माहिती.
अस्मिता (सिंजेंटा) – ही सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची एक संकरीत कारल्याची जात आहे. या जातीच्या कारल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या कारल्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची कोणत्याही हंगामात लागवड केली जाऊ शकते.
याच्या एका फळाचे वजन 130 ग्रॅम ते 140 ग्रॅम पर्यंत असते. एकरी 600 ते 700 ग्रॅम एवढे बियाणे वापरले जाते. या जातींचे पीक 55 ते 60 दिवसात परिपक्व होते
मोनिका (सकाटा) – ही सुद्धा कारल्याची एक संकरीत जात आहे. याच्या फळाचा रंग गडद हिरवा असतो. त्याच्या फळाची लांबी 15 सेमी ते 18 सेमी पर्यंत असते. एका फळाचे वजन 120 ग्रॅम ते 150 ग्रॅम पर्यंत असते. 50 ते 55 दिवसात पीक परिपक्व बनते.
अमनश्री (नान्हेम) – ही संकरीत कारल्याची एक सुधारित जात आहे. या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. याच्या फळाची लांबी 22 सेमी ते 24 सेमी पर्यंत असते. याच्या फळाचा रंग गडद हिरवा राहतो. सरासरी 50 दिवसात या जातीचे पीक काढणीसाठी तयार होत असते.
SW-811 (US Agriseeds) – ही जात यूएस ऍग्रीसीड्सने तयार केलेली संकरीत जात आहे. हायब्रीड कारल्याची लागवड करणारे शेतकरी या जातीला विशेष महत्त्व दाखवत आहेत. याच्या फळाची लांबी 18 सेमी ते 20 सेमी पर्यंत असते. एका फळाचे वजन हे 150 ग्रॅम ते 180 ग्रॅम पर्यंत असते. अवघ्या 60 ते 65 दिवसात या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी तयार होत असते.
नूर एफ१ (एस्सेन हायवे) – ही सुद्धा एक संकरीत कारल्याची जात आहे. याच्या फळाची लांबी 19 सेमी ते 20 सेमी पर्यंत असते. एका फळाचे वजन 140 ग्रॅम ते 150 ग्रॅम पर्यंत असते. त्याचे पीक सरासरी 50 दिवसांनी काढणीसाठी तयार होत असते. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.