Weather Update : गेल्या वर्षी नैऋत्य मानसूनवर एलनिनोचा प्रभाव होता. यामुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यात तर परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. राज्यातील बहुतांशी भागात आता पाण्याचे संकट पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी धरणांनी तळ गाठला आहे. धरणे कोरडी होऊ लागली आहेत. तसेच यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार ? गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी दुष्काळ पडणार का ? येत्या मान्सूनवर एलनिनोच सावट राहणार का ? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
दरम्यान याच संदर्भात काही जागतिक हवामान संस्थानांनी अंदाज व्यक्त केले आहेत. आशिया-पॅसिफिक इकॉनोमिक कॉर्पोरेशन या संस्थेने देखील याबाबत आपला सुधारित अंदाज जारी केला आहे. भारतातील मान्सून बाबत हा या संस्थेचा पहिलाच अंदाज आहे. यामध्ये एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर अशा दोन टप्प्यात अंदाज देण्यात आले आहे.
यामध्ये संस्थेने असे म्हटले आहे की जुलै ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या संस्थेने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या मान्सून कालावधीत जगातील अनेक भागांमध्ये अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यात पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण दक्षिण पॅसिफिक प्रदेशापर्यंत सामान्यपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच या काळात पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असे देखील या संस्थेने म्हटले आहे.
दुसरीकडे अनेक जागतिक हवामान संस्थांनी जून महिन्यात ला निना येण्याची शक्यता वर्तवली आहे. पण, ला निना ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अधिक तीव्र होणार आहे, या कालावधीत ला निना ठळकपणे पाहायला मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून भारतासहित अनेक देशांमध्ये सामान्य पेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो असा अंदाज दिला जात आहे.
एकंदरीत यंदाचा मानसून हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. एल निनो आता हळूहळू निघून जात आहे असे काही हवामान संस्थांनी म्हटले आहे. यामुळे यंदाच्या मान्सून मध्ये भारतात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु मे महिन्यातच याबाबतची स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.
त्यामुळे मे महिन्यापर्यंत साऱ्यांनाच वाट पहावी लागणार आहे. पण, यंदाच्या मान्सून काळात अनेक हवामान संस्थांनी चांगला पाऊस होणार असा अंदाज अनेकांनी दिला असल्याने ही कृषी क्षेत्रासाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. तथापि एप्रिल महिन्यात जेव्हा भारतीय हवामान विभाग आपला पहिला मान्सूनचा अंदाज जारी करेल तेव्हाच आगामी मान्सून कसा राहू शकतो याबाबत योग्य ती माहिती समोर येणार आहे.