महाराष्ट्रमध्ये काही दिवसां अगोदर पावसाने थोडीशी उघडीप दिल्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नद्यांना पाणी आले आहे तर काही ठिकाणी धरणाच्या पाणीसाठ्या मध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या या पावसामुळे शेतकरी राजा देखील सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे.
परंतु आता प्रश्न पडला आहे की सुरू झालेला हा पाऊस आणखी राज्यात किती दिवस थांबेल किंवा येणाऱ्या दोन पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाची कशी स्थिती राहील? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आले असून हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असून गुरुवारपासून मात्र राज्यात पाऊस काहीसा कमी होईल असा देखील अंदाज हवामाना विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
आज कोणत्या ठिकाणी आहे पावसाचा अंदाज?
आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर आज कोकणात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस होण्याची शक्यता असून कोकणातील रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच मुंबई आणि पालघर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
त्यासोबतच सातारा आणि पुणे या ठिकाणी देखील जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आपण जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर त्या ठिकाणी नगर तसेच नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भ व संपूर्ण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
उद्या कसे राहील पावसाचे प्रमाण?
उद्या म्हणजेच बुधवारचा विचार केला तर उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा व मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी तसेच जालना व नांदेड जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यासोबतच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरुवारपासून मात्र राज्याच्या काही भागात पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज असून मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकण इत्यादी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा जास्त राहिल अशी देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एवढेच नाही तर शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व त्यासोबतच कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.