Nagpur Goa Expressway : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे 701 किलोमीटर लांबीपैकी 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धीचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील जुलै 2024 अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी सुरवात केली आहे. या महामार्गासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पूर्ण झाली आहे.
यामुळे या महामार्गाचे भू संपादनाचे काम सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर विरोध होतच आहे शिवाय कोकणातही या महामार्गाला विरोध होतोय. माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
सांगलीवाडी येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात झालेल्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी बोलताना हा ईशारा दिला आहे. यावेळी कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग का तयार केला जातोय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाही तर काँग्रेसने तयार केलेला भूमी अधिग्रहण कायदा भाजपने बदलला आणि यामुळे शेतकऱ्यांना फारच कमी नुकसान भरपाई मिळणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली असून हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
या महामार्गामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होतील असा आरोप शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असलेला शक्तिपीठ महामार्ग नेमका आहे तरी कसा हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे शक्तिपीठ महामार्ग ?
या महामार्गाची घोषणा 2023 मध्ये माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महामार्ग ८०५ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.
हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ही जिल्हे यामुळे जोडले जातील. हा एक सहापदरी एक्सप्रेस वे असणार आहे. जे जिल्हे समृद्धी महामार्गाने कनेक्ट झालेले नाहीत ते जिल्हे या महामार्गाने कनेक्ट होतील असे बोलले जात आहे.
हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग राहणार असून यासाठी 8,000 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे अर्ध शक्तीपीठ वगळता राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार आहे. कोल्हापूर, तुळजापूर आणि नांदेड मधील माहूर हे 3 शक्तीपीठ हा महामार्ग परस्परांना जोडणार आहे.
हा मार्ग राज्यातील दोन ज्योतिर्लिंगाना जोडेल. शिवाय राज्यातील इतरही अनेक महत्त्वाची देवस्थाने या महामार्गामुळे कनेक्ट होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये 19 देवस्थाने या महामार्गामुळे परस्परांशी जोडली जाणार आहेत.
या महामार्गासाठी 86,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या स्थितीला नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी 21 तासांचा कालावधी लागतोय. मात्र या मार्गामुळे हा कालावधी 11 तासांवर येणार आहे. म्हणजे प्रवासाचे तब्बल दहा तास वाचणार आहेत.