Hen Rearing : भारतात शेती सोबतच कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय देशातील ग्रामीण भागाचा कणा बनला आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी आणि शेतमजूर छोट्या प्रमाणात का होईना पण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात.
हा व्यवसाय ग्रामीण भारताचा कणा आहे. कुक्कुटपालन मांस आणि अंडी उत्पादनासाठी केले जाते. त्यामुळे या व्यवसायात कोंबडीच्या चांगल्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते.
ज्या कोंबडींची अंडी उत्पादन क्षमता चांगली असते अशा जातींची निवड केल्यास या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे आज आपण कोंबडीच्या अशाच एका जातीची माहिती पाहणार आहोत ज्याचे अंडी उत्पादन हे इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे.
कोंबडीची सर्वात जास्त अंडी देणारी जात
व्हाईट लेगहॉर्न ही कोंबडी ची सर्वात जास्त अंडी देणारी जात म्हणून ओळखली जाते. इतर जातींच्या तुलनेत या जातीची अंडी उत्पादन क्षमता ही खूपच अधिक आहे. या जातीचे उगमस्थान हे इटलीचे आहे.
परंतु, अलीकडे या जातीचे संगोपन इतरही देशांमध्ये होत आहे. सर्वात जास्त अंडी उत्पादन देणारी जात म्हणून या कोंबडी कडे पाहिले जाते. हे पक्षी आकाराने खूपच लहान असतात. या जातीच्या कोंबडीची पाठ ही लांब असते.
आकाराने लहान असतानाही या जातीच्या कोंबडी पासून चांगले अंडी उत्पादन मिळवता येते हे विशेष. या जातीची कोंबडी सर्व प्रकारच्या वातावरणात तग धरून राहते.
परंतु उष्ण आणि कोरड्या हवामानात या जातीच्या कोंबड्या फारशा प्रतिसाद देत नाहीत याची देखील नोंद घेणे आवश्यक आहे. या जातीच्या कोंबड्या पांढऱ्या तपकिरी आणि काळ्या रंगात आढळतात. मात्र यामध्ये व्हाईट लेगहॉर्न सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.
या कोंबडीची अंडी उत्पादन क्षमता ही वार्षिक 220 ते 250 एवढी आहे. त्यासाठीच्या कोंबड्याचे वजन हे सरासरी पावणे तीन किलो पर्यंत असते आणि कोंबडीचे वजन हे पावणेदोन किलोपर्यंत असते.