Havaman Andaj : राज्यासह देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. तापमानात चढ-उतार सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यासह देशाच्या दक्षिण भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसला.
दरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तेथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईमध्ये तर शहरात पूरस्थिती निर्माण झाली यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 13 डिसेंबर पर्यंत पाऊस पडणार असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे.
IMD ने वर्तवलेल्या नवीन हवामान बुलेटीनुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ-माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंदमान-निकोबार बेटे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगाल, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल या भागातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय जम्मू आणि काश्मीर मध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत अजून काही दिवस महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. मात्र आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी निश्चितच रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र पावसाचा जोर हा खूपच कमी झाला असून राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.