Havaman Andaj : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. मान्सून आगमनानंतर राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. गेल्या महिन्यात राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोराचा पाऊस झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र म्हणावा तसा पाऊस नाही.
अगदी मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील चांगला पाऊस बरसलेला नाही. तसेच उत्तर कोकणाच्या तुलनेत दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे.
मध्य महाराष्ट्रातील फक्त घाटमाथ्यावर चांगला जोरदार पाऊस आहे उर्वरित मध्य महाराष्ट्र विभागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी पडला आहे. हवामान खात्याने जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याचे सांगितले आहे.
यामुळे आता जुलै महिन्यात हवामान कसे राहणार, या चालू महिन्यात पाऊसमान कसे राहणार, कोणत्या जिल्ह्यात सरासरी एवढा आणि कोणत्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार? यासंदर्भात जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे या चालू महिन्यात महाराष्ट्रातील कोणत्याचं जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार नाही.
राज्याच्या मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, नाशिक, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मुंबई शहर, उपनगर अन कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, खानदेशातील नंदुरबार, धुळे, मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भ विभागातील बुलढाणा, अकोला, अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात 106% पाऊस पडण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.
म्हणजे जुलै महिन्यात यासंबंधीत जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहणार आहे. तसेच राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात 96 ते 104% पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
म्हणजे यासंबंधीत जिल्ह्यात जुलै मध्ये सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस राहणार आहे.
तसेच, पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्र विभागात मध्यम स्वरूपाच्या आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.