Havaman Andaj : भारतात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. या पावसाळी काळात पडणाऱ्या पावसावरच संपूर्ण वर्षातील शेतीचे नियोजन अवलंबून असते. गेली तीन वर्ष खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाला होता. यंदा मात्र भारतीय मानसूनवर एल निनोचा प्रभाव पाहायला मिळत आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे या मान्सूनमध्ये आत्तापर्यंत समाधानकारक असा पाऊस झालेला नाही.
यंदाच्या मान्सूनचा तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. या तीन महिन्यांपैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात तर जवळपास 25 ते 26 दिवसांचा पावसाचा खंड नमूद करण्यात आला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः करपण्याच्या अवस्थेत आहेत.
मात्र आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेषतः कालपासून अर्थातच गुरुवारपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली. दरम्यान आज महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर आणखी वाढणार अशी शक्यता हवामाना विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर के एस होसाळीकर यांनी पावसासंदर्भात मोठे अपडेट दिले आहे.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या तीन ते चार तासात पावसाची तीव्रता खूपच वाढणार आहे. राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात येत्या तीन ते चार तासात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचे ढग जमा होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय भारतीय हवामान विभागाने आज 8 सप्टेंबर 2023 रोजी राजधानी मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली ठाण्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.