Havaman Andaj : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. कोकण, मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून पावसाने विश्रांती घेतली. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आगामी काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
खरे तर काल राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी 150 mm पेक्षा जास्त पावसाची नोंदणी करण्यात आली आहे.
तर दावडी येथे सर्वाधिक 200 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज तीन ऑगस्टला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय आज कोकणातील दक्षिणेकडील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज मुंबईसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यासाठी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात, लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सावध राहण्याचा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिला आहे.