Havaman Andaj September 2023 : महाराष्ट्रात गणरायाच्या आगमना बरोबरच वरूणराजाने देखील दबक्या पावलाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. खरंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून सप्टेंबर मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
हवामान खात्याने त्यावेळी जारी केलेल्या आपल्या बुलेटिनमध्ये सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस झाला नाही यामुळे हवामान खात्याचा हा देखील अंदाज फोल ठरणार असे सांगितले जात होते.
परंतु तसे काही झाले नाही दुसऱ्या आठवड्याच्या अगदी सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचे हजेरी लागली. 10 सप्टेंबर नंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला.
11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले होते. मात्र 19 सप्टेंबर रोजी अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली. गणरायाच्या आगमना बरोबरच वरूणराजाचे देखील आगमन झाले.
गणपती बाप्पा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. गणेश चतुर्थी पासून ते गौरी पूजन पर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. मात्र 22 सप्टेंबर रोजी अर्थातच गौरी पूजनाच्या दिवशी राज्यात पावसाचा जोर वाढला. 22 सप्टेंबरला मध्यरात्री नागपूर विभागात ढगफुटी सारखा पाऊस झाला. काही भागातील शेत जमिनी खरडून निघाल्यात एवढा पाऊस तेथे पडला.
सखल भागात या पावसामुळे पाणी साचले आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी अर्थातच 25 सप्टेंबरला मात्र राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी झाला. यामुळे आता पावसाचा जोर कमी होणार असे सांगितले जात होते. मात्र अशातच मंगळवारी अर्थातच काल राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचे हजेरी लागली.
राज्यातील कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात काल मुसळधार पावसाची हजेरी लागली. विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे राज्यातील 30 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, वासिम, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.