Havaman Andaj October 2023 : मान्सून 2023 आता येत्या काही दिवसात संपुष्टात येणार आहे. पावसाळा जवळपास संपत आला आहे तरीही महाराष्ट्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. यानंतर जुलै महिन्यामध्ये राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढला. जुलै महिन्यातील पावसाने जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून काढली होती.
अशातच मात्र ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पाऊसच पडला नाही. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट गडद झाले. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची आशा होती पण आता सप्टेंबर महिन्यातील 22 दिवसांचा काळ उलटला तरीही राज्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा एकदा उसंत घेतली आहे. एकंदरीत मान्सूनच्या लहरीपणामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यासह संपूर्ण मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
यानंतर 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. या दोन आठवड्यांच्या काळात महाराष्ट्रात देखील सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर पाच ते 12 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात म्हणजेच 24 सप्टेंबरपासून ते 26 सप्टेंबर पर्यंत राज्यातील मुंबईसह कोकण व खानदेश मधील नंदुरबार, धुळे, जळगाव, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आजपासून ते 24 सप्टेंबरपर्यंतचे चार दिवस उत्तर आणि दक्षिण कोकणात सर्वत्र पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत राज्यात आगामी काही दिवस पावसाची शक्यता असल्याने हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असे सांगितले जात आहे.