Havaman Andaj : महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून आगमनानंतर जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील काही भागांमधील शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
हवामान खात्याने निम्म्याहुन अधिक भारतात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने देशातील 25 राज्यांमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग होणार असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने आज 30 जून 2024, रविवारी आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाजात देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. नुकतेच सॅटेलाइटवरून घेतलेल्या छायाचित्रांतून ही बाब समोर आली आहे.
IMD नुसार, पंजाब आणि लगतच्या हिमाचल प्रदेश, दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या उत्तर-पूर्व छत्तीसगड, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड लेख दक्षिण गुजरात, दक्षिण तेलंगणा येथे होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस आणि गडगडाट. जोरदार वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पण, गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षात असणाऱ्या शेतकऱ्यांना या वादळी पावसाचा दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.
ओडिशा, कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, केरळ, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, लक्षद्वीप आणि निकोबार बेटांवर सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एकंदरीत राज्यातील कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि घाटमाथ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा जोर अधिक असल्याचे आहे.
दरम्यान , भारतीय हवामान खात्याने राज्यातील याच विभागात आता आणखी पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे काही हवामान तज्ञांनी पुढील महिन्यात पावसाचा आणखी जोर वाढणार अशी भविष्यवाणी केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय पंजाबराव डख यांनी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी चार जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असे म्हटले आहे. म्हणजे चार जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.