Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसतोय. शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. ऐन काढणीच्या अवस्थेत झालेल्या वादळी स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला असून यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आता व्यक्त होत आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज पासून पुढील आठवडाभर राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची तर काही भागात अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. या पूर्व मौसमी पावसामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून पुढील आठवडाभर अर्थातच 13 मे पर्यंत विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली, मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या 19 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. अर्थातच खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाहीये.
मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे. दुसरीकडे हे 19 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून ढगाळ हवामानाची देखील शक्यता राहणार नसल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे.
खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात मात्र आज पासून पुढील तीन दिवस उष्ण रात्रीचा अनुभव येणार आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी असह्य उकाडा जाणवणार आहे. राज्यातील बहुतांशी भागातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
याशिवाय विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी चार दिवस उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती पाहायला मिळू शकते.
या भागात दिवसाचे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणार असा अंदाज हवामान अभ्यासक खुळे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचा बचाव करायचा आहे.
दरम्यान येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होणार असून यावर्षी मान्सून वेळेआधीच भारताच्या मुख्य भूमीत दाखल होऊ शकतो असा कयास बांधला जात आहे. निश्चितच ही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची राहणार आहे.