Havaman Andaj : सध्या राज्यातील विविध भागांमध्ये खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर आहे. काही भागांमध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांची हार्वेस्टिंग सुरू देखील झाली आहे. ज्या ठिकाणी हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे त्या भागात नवीन शेतमालाची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. दिवाळीचा काळ जवळ आला असल्याने शेतकऱ्यांना पैशांची निकड आहे यामुळे शेतकरी बांधव काढणी झालेला शेतमाल लगेचच विक्री करत आहेत.
यासोबतच राज्यातील विविध भागात आता रब्बी हंगामातील पीक पेरणीला वेग आला आहे. काही ठिकाणी रब्बी पिकांसाठी पूर्व मशागतीची कामे केली जात आहेत तर काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू आहेत. दरम्यान राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. तापमानात मोठी चढ-उतार होत आहे.
सकाळी-सकाळी गुलाबी थंडीची देखील चाहूल लागली आहे. मात्र दिवसा कडक ऊनही पडत आहे. यामुळे काही भागात अजूनही उकाडा भासत आहे. एकंदरीत राज्यात सर्वत्र संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार होत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. अशातच आता राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या पावसाचा कोरडवाहू भागातील खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, यावर्षी राज्यात मानसूनचे उशिराने आगमन झाले होते यामुळे कोरडवाहू भागात उशिराने पेरण्या झाल्या होत्या.
अशा परिस्थितीत सध्याचा अवकाळी पाऊस या कोरडवाहू पिकांसाठी जीवनदान देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे या पावसाचा सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फायदा मिळणार आहे. पण हा अवकाळी पाऊस खरीप हंगामातील हार्वेस्टिंगसाठी तयार झालेल्या पिकांसाठी मोठा घातक ठरणार आहे.
तसेच दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात झेंडूचे उत्पादन घेतले जाते. दिवाळीच्या काळात झेंडूची फुले काढण्यासाठी तयार होतात. अशा परिस्थितीत हा अवकाळी पाऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो असा अंदाज आहे. एकंदरीत या अवकाळी पावसामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुठे बरसणार पाऊस ?
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील दक्षिण भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात राज्यातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच पुढील तीन ते चार दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र या परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संबंधित भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
या भागात लागली पावसाची हजेरी
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी देखील लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यासह आष्टा, विटा या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस चालू आहे. तसेच पुण्यात दुपारी पावसाला सुरुवात झाली होती. सोलापूरमध्येही पहाटे पाऊस झाला होता.
कोकणातही काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही तासांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. एकंदरीत राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीसाठी तयार झालेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.