Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी बीड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी खास राहणार आहे.
कारण की या आठ जिल्ह्यांमध्ये 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान कसे हवामान राहणार, पाऊसमान कसे राहणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून मोठी अपडेट हाती आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात पुढील तीन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू तापमान आणखी वाढणार आहे.
पुढील पाच दिवस मराठवाड्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई च्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मराठवाडयात अर्थातच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी बीड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये दि. 08 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
या काळात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहील तसेच कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. याशिवाय पंधरा ते 21 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरी पेक्षा कमी राहणार आहे आणि कमाल तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक कामाचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात गव्हाची वेळेवर पेरणी करायला हवी. या काळात बागायती गव्हाची वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, गोदावरी, फुले समाधान इत्यादी सुधारित गव्हाच्या वाणांची निवड करावी असाही सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गव्हाची पेरणी करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे,
याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 109 किलो युरिया प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.