Havaman Andaj : राज्यात आता गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानाने आणि पावसाळी वातावरणाने काढता पाय घेतला असून राज्यात आता थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सकाळी सकाळी गारठा जाणवत आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याकडून एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरे तर महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आता थंडीची चाहूल लागली आहे किंबहुना काही भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात देखील झाली आहे.
मात्र दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही पावसाचे सत्र सुरू आहे. अर्थातच देशात सध्या संमिश्र हवामान आहे. दक्षिणेकडे राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय आहे.
देशाच्या मैदानी प्रदेशांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे आणि याचा प्रभाव मैदानी भागांमध्ये जाणवू लागला आहे. दुसरीकडे डोंगराळ भागात दाट धुके कायम आहेत.
या साऱ्या घडामोडींमध्येच आता बंगालच्या उपसागरात एका नव्या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा कमी दाबाचा पट्टा त्यापुढील काही तासांमध्ये तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनारपट्टी भागांकडे सरकणार अशी परिस्थिती सध्या जाणवत आहे.
यामुळे मात्र आपल्या देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच या संबंधित राज्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस होईल असा देखील अंदाज देण्यात आला आहे. या वादळाचा प्रभाव म्हणून आंध्र प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
IMD नुसार, आजही किनारपट्टीवर तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी विशेष सावध राहावे असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.
तसेच आज पासून पुढील काही दिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर पर्यंत आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारपट्टी भाग, तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार असेही म्हटले गेले आहे.
तसेच मागील काही तासांमध्ये देशातील तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे येथे वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला अशी नोंद करण्यात आली आहे.