Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रातील हवामानात सध्या लहरीपणा पाहायला मिळत आहे. वातावरणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा चेंज आला आहे. तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.
काही भागात थंडीची चाहूल लागली आहे तर काही ठिकाणी दुपारी उन्हाचे चटके बसत आहे. जळगाव मध्ये सकाळच्या तापमानात मोठी घट आली आहे. जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे यांसारख्या भागांमध्ये सकाळी थंडी पडत आहे.
पण दुपारी उन्हाचे चटकेही सहन करावे लागत आहे. यामुळे समिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना येत आहे. सकाळी-सकाळी तापमान कमी होत आहे. यामुळे सकाळी वातावरणात गारवा तयार होतोय तर दुपारी उन्हाचे चटके बसत असल्याने अजूनही हिवाळ्यासारखां फिल तयार होत नाहीये.
विशेष म्हणजे हवामान खात्याने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्याचे कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित अधिक राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर आता महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी अर्थातच उद्या आणि परवा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. परंतु ढगाळ हवामान तयार झाले असेल तरीही अद्याप राज्यात कुठेच पावसाने हजेरी लावलेली नाही.
पावसाळी वातावरण तयार होत आहे मात्र पाऊस कुठेच बरसलेला नाही. पण आता हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग ?
हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या अर्थातच चार नोव्हेंबर रोजी आणि पाच नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजा आणि ढगांच्या गडगडाटासह सिंधुदुर्गात पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे. शिवाय हे दोन दिवस 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे देखील वाहतील असा अंदाज आहे.
यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सतर्क आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. पावसाचे वातावरण पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे जाणकारांनी सांगितले आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
आज कसं राहणार देशातील हवामान
आज देशातील दक्षिण भागातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तमिळनाडू, पुद्दूचेर्री, कराईकल, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात आज पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून या भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल असे सांगितले जात आहे.
काही भागात मुसळधार पावसाचा देखील अंदाज आहे. यामुळे संबंधित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.