Grape Farming : द्राक्ष हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. राज्यातील नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.येथील द्राक्ष साता-समुद्रापार निर्यात केले जातात.
यामुळे द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा चहुमुलखी डंका वाजत आहेत.दरम्यान याच द्राक्षाच्या आगारातून एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.ती म्हणजे येथील एका प्रयोगशील द्राक्ष उत्पादकाने द्राक्षाचे नवीन वाण विकसित केले आहे.
जिल्ह्यातील पाथर्डी येथील शेतकरी रामचंद्र दगुजी चुंभळे यांनी उत्कर्षा नावाचे नवीन काळ्या द्राक्षाचे वाण शोधले आहे. रामचंद्र यांनी निवड पद्धतीने हा नवीन वाण विकसित केला आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून या वाणासाठी नोंदणी प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.
अर्थातच आता चुंभळे यांच्या संमतीशिवाय या वाणाच्या रोपाची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण आयात, निर्यात कोणालाही करता येणार नाही. रामचंद्रजी यांची या वाणाच्या उत्पादनासाठी संमती आवश्यक राहणार आहे. दरम्यान रामचंद्र यांनी त्यांच्या मुलीचे नाव या द्राक्षे वाणाला दिले आहे.
कसा शोध लागला
रामचंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे 2017 मध्ये त्यांनी लागवड केलेल्या शरद सीडलेस या वाणाच्या द्राक्ष बागेतील एका झाडावर एक वेगळी वेल दिसून आली. या वेलीला रेगुलर शरद सीडलेस पेक्षा अधिक जाड आणि मोठ्या मण्या आढळून आल्यात.
यामुळे त्यांनी या वेलीपासून नवीन रोप तयार केले आणि त्यांची लागवड केली. 2018 मध्ये या वेलीपासून त्यांनी 15 रोपे तयार केली होती. पुढे याच रोपांपासून त्यांनी दीड एकरावर द्राक्षाची बाग लावली. यातून त्यांना चांगले परिणाम मिळाले.
पुढे त्यांनी या उत्कर्षा वाणासाठी भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे 2022 मध्ये अर्ज केला. यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या वाणाला मान्यता देण्यात आली आणि सर्व अधिकार रामचंद्र यांना मिळालेत.
नवीन वाणाच्या विशेषता
हा काळ्या द्राक्षाचा नव्याने विकसित झालेला उत्कर्षा वाण अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीपासून एकरी दहा टन पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या जातीचे द्राक्षे मणी आकाराने मोठे आहेत.
या जातीच्या द्राक्षमण्यांचा आकार 22 मिमी पर्यंत आहे. गोडीबहर छाटणी पश्चात अवघ्या चार ते सव्वाचार महिन्यात या जातीचे पीक हार्वेस्टिंगसाठी तयार होत असल्याचा दावा केला जात आहे.
या जातीच्या द्राक्षाच्या मण्यावरील साल खूपच पातळ आहे आणि हे द्राक्ष चवीला खूपच गोड आहेत. या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या फारशी भेडसावत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार आणि चांगले उत्पादन मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.