Gram Farming : हरभरा हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून शासन तेलबिया आणि कडधान्य पिकांना चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
देशातील कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून देखील देशातील कडधान्य आणि तेलबिया उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने कडधान्य आणि तेलबिया पिकाच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या जात आहेत.
दरम्यान, भारतीय कृषी संशोधन संस्थेने हरभऱ्याचा एक नवीन वाण विकसित केला आहे. हरभऱ्याची ही नवीन जात कमी खर्चात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे हरभऱ्याचा हा नवीन वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे.
25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर हा कालावधी हरभरा पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही यंदा हरभऱ्याची पेरणी करू इच्छित असाल तर या जातीची लागवड करून तुम्ही चांगली कमाई करू शकणार आहात. यामुळे आज आपण हरभऱ्याच्या या अलीकडेच विकसित झालेल्या जातीची संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हरभऱ्याच्या नव्याने विकसित झालेल्या जातीच्या विशेषता
भारतीय कृषी संशोधन संस्थेने हरभऱ्याची पुसा चना 20211 अर्थातच पुसा मानव ही हरभऱ्याची नवीन जात विकसित केली आहे. खरे तर, ही जात तीन वर्षांपूर्वीच म्हणजेच 2021 मध्येच लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे.
ही जात गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आलेली आहे. यामुळे, राज्यातील अनेक शेतकरी बांधव हरभऱ्याच्या या जातीची लागवड करत आहेत.
कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हरभऱ्याचा हा वाण 108 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होतो. ज्या राज्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते तेथे याची लागवड पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेश, गुजरात आणि आपल्या महाराष्ट्रात हरभऱ्याचा हा नवा वाण चांगलाच लोकप्रिय होत आहे.
खरंतर हरभरा जेव्हा रोप अवस्थेत असतो तेव्हा त्याच्यावर मुळकुज आणि मररोग येण्याची भीती सर्वाधिक असते. यामुळे शेतकऱ्यांनी मर रोगास अन मुळकूज रोगास प्रतिबंधक अशा हरभऱ्याच्या जातीची लागवड करावी असा सल्ला दिला जातो.
पुसा मानव हा देखील असाच एक वाण आहे. ही जात मर रोगास अन मुळकूजसाठी प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. शेंगा पोखरणाऱ्या आळींना देखील हा वाण मध्यम प्रतिकारक आहे.
रब्बी हंगामात या जातीची वेळेवर पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते. ही जात बागायती भागात लागवडीसाठी शिफारशीत आहे. या जातीपासून सरासरी 24 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळते मात्र कमाल हेक्टरी उत्पादन हे 32 क्विंटल पर्यंत जाते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.