Goregaon Mulund Link Road : राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये लोकसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. यामुळे शहरात आणि उपनगरात पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था वाढत्या लोकसंख्येमुळे प्रभावित होत आहे.
यामुळे शहरासहित उपनगरातील नागरिकांना चांगली दळणवळण व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून कंबर कसण्यात आली आहे. राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे अजूनही सुरू आहेत. यामध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो.
खरेतर हा मुंबई उपनगरातला चौथा जोड रस्ता प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोयीचे होणार आहे.
हा प्रकल्प प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत करणार आहे. यामुळे नागरिकांचे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत गोरेगाव ते मुलुंड दरम्यान १२.२० किलोमीटर लांबीचा जोड रस्ता तयार होणार आहे.
सध्या या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. यानुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दोन भुयारी मार्गाच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे.
गोरेगाव येथील फिल्मसिटी ते पूर्व उपनगरातील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत दोन भुयारी मार्ग याच प्रकल्पांतर्गत बांधले जाणार आहेत. या संपूर्ण जोड रस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण होणार असून तिसऱ्या टप्प्यात बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 8137 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. म्हणजेच अवघ्या 12.20 किलोमीटर लांबीच्या जोड रस्त्यासाठी 8137 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुलुंड ते गोरेगाव हा प्रवास फक्त आणि फक्त वीस मिनिटात शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी प्रवाशांना एका तासाहून अधिकचा कालावधी खर्च करावा लागत आहे.
परंतु जेव्हा हा जवळ रस्ता तयार होईल आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा प्रवाशांना फक्त 20 मिनिटात ह्या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करता येईल. एकंदरीत या प्रकल्पामुळे पूर्व उपनगरातील आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.